नांदेड - एकिकडे भौतिकीकरणामुळे मानव विकासाच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला आहे. परंतु, दुसरीकडे अनेक नैसर्गिक संकट निर्माण होत आहे. आधुनिक काळात जलसंकटाची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. जलसिंचन क्षेत्रात डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. जलसिंचन क्षेत्रात अतुलनीय व शाश्वत कामगिरी करून डॉ. शंकरराव चव्हाण यांनी देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपल्या कार्याचा आगळा-वेगळा ठसा निर्माण केला.
वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील मागासलेल्या मराठवाड्याचे भविष्य उज्जवल करण्यासाठी गोदावरी खोऱ्यावर विविध ठिकाणी मोठी धरणे बांधावे, असा निर्धार डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांची समृद्धी करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नाही, ही शाश्वत विकासाची जाणीव डॉ. शंकरराव चव्हाण यांना होती.
महाराष्ट्रात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने व विचाराने अनेक लघु व मोठे जलप्रकल्प उभे राहिले. यातून हजारो, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस कारणीभूत ठरले. या माध्यममातून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला व यातूनच औद्योगिक विकास कार्यास चालना मिळाली. म्हणूनच डॉ. शंकरराव चव्हाण यांना विकासाचा महामेरू, आधुनिक भगीरथ, जलसंस्कृतिचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकारणातील हेडमास्तर, अशा कितीतरी विशेषनांनी संबोधले जाते.
जलसिंचन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी -
एकीकडे कृष्णा खोऱ्यावर विविध धरण बांधल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येत होता. पण दुसरीकडे मराठवाडा होरपळत होता. कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर गोदावरी खोऱ्यातही धरणे व्हावी व मराठवाड्याचा विकास व्हावा, असे डॉ. शंकररावजी चव्हाण यांना वाटत होते. राज्याच्या व देशाच्या विविध मोठ्या पदावर काम करीत असताना त्या पदांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी डॉ. शंकररावजी चव्हाण हे प्रयत्नशील राहिले. त्यांनी लघु, मध्यम व मोठी अशी अनेक धरणे बांधली.
जायकवाडी प्रकल्प(नाथसागर) -
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचा 'जायकवाडी जलसिंचन प्रकल्प' महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचनप्रकल्प आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या धोरण व कार्यातून अफलातून अशा या प्रकल्पाची निर्मिती झाली. या प्रकल्पास ‘नाथसागर’ असे संबोधले जाते. सुरुवातीच्या काळात या प्रकल्पास तीव्र स्वरुपाचा विरोध झाला. औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक गावे या प्रकल्पाच्या जलाशयात बुडणार होती म्हणून दोन्ही बाजूने या धरणाचा विरोध झाला. अफाट विरोध होऊनसुद्धा चव्हाण यांनी या धरणाचे काम थांबवले नाही. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला ते सामोरे गेले. अनेक प्रसंगात त्यांना कटु अनुभवसुद्धा आला, ते त्यांनी सहजपणे स्वीकारलेत. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले व कालांतराने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या धरणाची साठवणूक क्षमता २,९०९ दशलक्ष घनमिटर असून जायकवाडी प्रकल्पामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड व अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार हेक्टर कोरडवाहू जमिनीची तहान शमली. धरण बांधणीच्यावेळी सर्वात मोठा प्रश्न पुनर्वसनाचे काम होते व यासोबतच अनेक प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करून हा जलाशय कृतीत आला. यामुळे आज औरंगाबाद, जालना, बीड, नगर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांची शेती तर ओलिताखाली आलीच, पण या भागाचे कायमचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेत. आज मराठवाड्यातील मोठ्या शहरामध्ये औद्योगिकीकरण वाढत असून त्यास पाणीपुरवाठा याच जलाशयातून होतो.
येलदरी धरण -
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूरपासून जवळच पूर्णा नदीवर येलदरी या धरणाची निर्मिती झाली. या धरणाचा लाभ हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. या धरणावरती विद्युत निर्मिती केंद्र सुद्धा उभारण्यात आले आहे. या धरणाचे पाणी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर या तालुक्यांना सुद्धा मिळत होते. या धरणाचा एक कालवा (कॅनाल) नांदेड शहरालगत असलेले कामठा बु. पर्यंत येत होता. नांदेडचे विस्तारित विमानतळ व नांदेड शहराच्या विस्तारीकरणामुळे हा कालवा बंद पडला व या कालव्यावर रोड बांधण्यात आला. पूर्वी नांदेड तालुक्यातील भाग म्हणजे अर्धापूर तालुक्यात पहिल्यांदा ज्या धरणाचे पाणी आले ते म्हणजे येलदरी, सिद्धेश्वर धरण होय. या धरणाच्या पाण्यावरच अर्धापूर व नांदेड शिवारात केळीचे पीक घेतले जाई. म्हणूनच या भागातील जनता डॉ. शंकरराव चव्हाण यांना दैवत मानतात.