नांदेड -जिल्ह्यातील कारवाडी (ता.अर्धापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष राऊत व सहशिक्षक बालाजी दूधंबे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कला, कार्यानुभव, शालेय शिक्षण, सहल, मातीपासून विविध मूर्ती बनविणे, शाळा व गाव परिसरात विविध झाडे लावणे. यासाठी सीड बॉल प्रात्यक्षिक, वृक्ष लागवड व जोपासना या विषयावर आधारित मुलांना उपजत कलागुणांना संधी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
तीन वर्षापासून सुरू आहे उपक्रम -
मुलांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे एक दिवस तरी दूर व्हावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड वाढावी. आठवड्यातील एक दिवस दप्तराविना आनंददायी शिक्षण मिळावे. यासाठी दर शनिवारी मुलांसाठी 'दप्तराविना शाळा' ( School without Bag ) ही संकल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी (ता.अर्धापूर) ( Z P School Marwad Nanded ) येथे गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मुले मनसोक्त जगण्याचा अनुभव या उपक्रमाच्या माध्यमातून घेत आहेत असे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.
शिवारफेरी व वनभोजन -
शनिवारी शिवारफेरीच्या माध्यमातून वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने शेतीविषयी माहिती देण्यात येत असते. यामध्ये विविध झाडांची, पक्षाची, प्राण्यांची, पिकाची, शेती अवजारे यासह अनेक विषयांची माहिती देण्यात येते. मुलही आपल्या अंगी असलेल्या सुप्त कला दाखवतात. विविध पक्षाचे आवाज काढणे, गाणी गाऊन, शेती व मैदानातील खेळ खेळत निसर्गाच्या सानिध्यात चिमुकल्यानी शिक्षणाचे धडेही गिरविले जातात.