नांदेड: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सलग आलेल्या दोन दिवसाच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सहस्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी या धबधब्याला भेट देतात. हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लाखो लोक येथे गर्दी करतात. हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेला आहे.
पर्यटकांची वाढली गर्दी: सततच्या पावसाने तीर्थक्षेत्र माहूर इथल्या वनराईने हिरवागार शालू परिधान केला आहे. माहूर शहराजवळच्या शेख फरीदबाबा दर्गाह इथला धबधबाही प्रवाहित झाला आहे. डोंगर दऱ्यातील पर्वतरांगांच्या कुशीतून नैसर्गिकरित्या हा धबधबा निर्माण झालेला आहे. शंभर फुटाच्या उंच दरीतून कोसळणारा हा धबधबा नयनरम्य असाच आहे. उंच डोंगरावरून कोसळणारे तुषार अंगावर झेलण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.