नांदेड - सागवान तस्करीसाठी कुख्यात कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील चिखली बुजुर्ग गावातून अंदाजे 2 घनमीटर सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यासोबत 2 रंदा मशीन जप्त करण्यात आले आहे.
चिखली येथील वन तस्करांकडून सागवान तस्करीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एस. आर. पी. युनिट सोबत चिखली याठिकाणी धाड टाकली. यावेळी हा ताफा पाहून गावातील अनेक तस्करांनी गावातून पळ काढला. या कारवाईत अंदाजे दोन घनमीटर कट साईज आणि गोल नग सोबतच 2 रंदा मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेला सर्व माल राजगड येथील वनअधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला आहे. वन विभागाच्या या कारवाई मुळे सागवान तस्करात एकच खळबळ उडाली आहे.