नांदेड - मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधीपक्ष दोघेही गंभीर नाहीत, अशी टीका खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आरक्षणासंदर्भात समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी ते नांदेडात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या -
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून सरकारबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. आरक्षणासाठी विरोधक आणि सत्ताधारी प्रयत्नशील नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठा आरक्षण संदर्भात समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच आरक्षणासाठी पुढील भूमिका ठरवण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका राजकीय पक्षाचा किंवा गटाचा नाही, तर तो समाजाचा प्रश्न आहे, असेदेखील ते म्हणाले. आरक्षण रद्द झाले आहे, आता मागे झालेल्या चुका सुधारून आरक्षणासाठी मार्ग शोधला पाहिजे, याबाबद मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.