नांदेड- बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे शनिवारी रात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले; बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा गळा दाबून खून अज्ञात मारेकऱ्यांनी महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला. त्यानंतर महारांजाची गळा दाबून हत्या केली. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले. त्यामुळे या मारेकऱ्यांनी पळ काढला. त्यानंतर महाराजांचे पार्थिव उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.
बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराज मठात आढळला आणखी एकाचा मृतदेह
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये भगवान शिंदे यांचा मृतदेह सापडला आहे. घटनास्थळी उमरी पोलीस दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पालघरमध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरूकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आवळल्या संशयित मारेकऱ्याच्या मुसक्या
पोलिसांनी संशयित आरोपी साईनाथ लिंगाडे याला तेलंगणातील तानूर येथून ताब्यात घेतले आहे. तपस्वी महाराजांसह भगवान शिंदे या दोघांची हत्या गावातीलच साईनाथ लिंगाडे या माथेफिरूने केल्याचा संशय गावकऱ्यांना होता. गावकऱ्यांनी त्याच्याविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. साईनाथ लिंगाडे एका खून प्रकरणातून जामिनावर सुटून आलेला आरोपी आहे. हा माथेफिरू गेल्या अनेक दिवसांपासून गावभर हातात कुऱ्हाड घेऊन गावातील लोकांना मारण्याची धमकी देत फिरत होता. याप्रकरणी गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि इतर गावकऱ्यांनी उमरी पोलीस ठाण्यात आरोपी साईनाथ लिंगाडे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीनंतर उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे याला पोलीस ठाण्यात आणून समज देऊन एका तासात सोडून दिल्याने ही घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.