नांदेड-भोकर नगरपरिषदेचा घनकचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता केशव मुद्देवाडला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात मुद्देवाडला हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
४ जून रोजी दुपारी घनकचरा उचलणारा ठेकेदार यशवंत ग्यानोबा प्रधान (रा.आष्टी ता. हदगाव) हे भोकर नगर परिषद मधून कामकाज करुन बाहेर येत होता. यावेळी नगर परिषद गेटसमोर माजी नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता केशव मुद्देवाड याने प्रधानला थांबवले. तू मागील दीड वर्षापासून ठेकेदारी करतोस. आजपर्यंत एकही रुपया दिला नाहीस. मागील कामाचे दीड लाख रुपये दे, अशी मागणी मुद्देवाड याने केली. दोन दिवसात पैसै नाही दिले तर पुढील टेंडर मिळू देणार नाही, अशी धमकीही प्रधानला दिली.