नांदेड- किनवट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यात शनिवारी (दि. 13 जून) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने इस्लापूर जवळचा पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे हिमायतनगर ते किनवट मार्गावरची वाहतूक काही काळ बंद होती. तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून तत्काळ संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
हिमायतनगर ते किनवट या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे. त्यातच या रस्त्यावर ओढ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या ओढ्यांवर बनवलेले पर्यायी पूल वाहून जाण्याचे प्रकार वाढत जाणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जात आहेत, त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.