महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देगलूर विधानसभा मतदारसंघ: शिवसेनेला भाजपची, तर काँग्रेसला वंचितची भीती? - देगलूर-बिलोली मतदारसंघ

मागच्यावेळी भाजप-शिवसेना वेगळे लढले. मात्र, या भागातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले वजन शिवसेनेच्या बाजूने टाकले. त्यामुळे त्याचा लाभही शिवसेनेच्या उमेदवाराला झाला होता.

देगलूर विधानसभा मतदारसंघ: शिवसेनेला भाजपची तर काँग्रेसला वंचितची भीती?

By

Published : Sep 25, 2019, 7:54 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे. मात्र, असे असले तरी अनेक दिग्गज भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने हा मतदातसंघ शिवसेनेने काबीज केला होता, हे सर्वश्रुत आहे. युती हो अथवा न हो यावेळीही भाजपच्या या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, तर काँग्रेससमोर मात्र वंचित आघाडी मोठा अडसर ठरण्याची भीती आहे.

तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेला हा मतदारसंघ अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. सुभाष साबणे हे २०१४ च्या निवडणुकीत केवळ ८ हजार ६४८ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचा पराभव करत साबणे आमदार झाले. साधी राहणी आणि तगडा जनसंपर्क अशी साबणेंची ओळख आहे. आपण भले आणि आपला मतदारसंघ भला, अशी साबणे यांची शैली आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तीक विरोधक फारसे नाहीत. त्यामुळेच मुखेडकर असलेले साबणे देगलूरमधून निवडून येऊ शकले. विशेष म्हणजे ते मराठवाड्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे आता निवडून आले तर त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत साबणे पुन्हा निवडून येतील का? हा खरा प्रश्न आहे. त्यातच मागच्यावेळी भाजप-शिवसेना वेगळे लढले. मात्र, या भागातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले वजन शिवसेनेच्या बाजूने टाकले. त्यामुळे त्याचा लाभही शिवसेनेच्या उमेदवाराला झाला होता.

मुख्य लढत :

शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष आहे. काँग्रेसकडून यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजय वरवंटकर, गृह खात्यातून निवृत्त झालेले भी. ना. गायकवाड हे तिघे जण उत्सुक आहेत. त्यापैकी वरवंटकर हे काँग्रेसची उमेदवारी पक्की समजून कामाला लागले आहेत.

वरवंटकर यांच्या अनेक जमेच्या बाजू आहेत. शिवाय त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे. अशा स्थितीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी, असा स्थानिकांचा आग्रह आहे. दुसरीकडे काँग्रेसचेच गायकवाड हे देखील मतदारसंघात भेटीगाठी घेत आहेत, तर भाजपने येथे २०१४ साली उद्योजक भीमराव क्षीरसागर यांना उमेदवारी दिली होती. पण ते तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. स्थानिक पातळीवरच्या राजकारणाने त्यांना वेळेवर धोका दिला. त्यामुळे यावेळीही क्षीरसागर हे पुन्हा इच्छुक दिसत आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मारोती वाडेकर यांनीही भाजपकडे उमेदवारी मागीतली आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात चमत्कार होईल, असा अंदाज आहे. याशिवाय धोंडीबा मिस्त्री यांचेही नाव भाजपाकडून चर्चेत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देगलूर विधानसभा मतदासंघातून भाजपला २३ हजार मतांची आघाडी मिळाली होती. पण, ही आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत टिकेल का? हा खरा प्रश्न आहे. त्यावरच विद्यमान आमदारांचे भवीतव्य अवंलबून आहे. वंचित आघाडीसाठी हा मतदारसंघ चांगलाच पोषक आहे. वंचितकडून उत्तम इंगोले, उत्तमकुमार कांबळे, मिलिंद शिकारे, गुंडेराव गायकवाड यांनी उमेदवारी मागितली आहे.


बिलोली-देगलूरच्या समस्या -

तालुक्यात मांजरा आणि लेंडी अश्या दोन प्रमुख नद्या आहेत. मात्र, सिंचनाचे प्रमाण अत्यल्प आहे. नवीन सिंचन प्रकल्प आले नसल्याने सिंचनात वाढ झालेली नाही. केवळ नदी काठच्या गावातील शेती सिंचनाखाली आहे. नव्याने जलप्रकल्प या दोन्ही तालुक्यात निर्माण झालेच नाही. उद्योगधंदे नसल्यामुळे येथील मतदारांना जवळच्या हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नाही. या तालुक्यातील नदी पात्रात लाल रंगाची रेती आहे. या लाल रेतीला आंध्र-कर्नाटकमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे या नदीपात्रातून जागोजागी रेतीची तस्करी केल्या जाते. रेतीच्या उलाढालीत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. मात्र, सरकारच्या तिजोरीत नगण्य रक्कम जाते. रेती तस्कर फोफावल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. मात्र, यावर कोणतेही राज्यकर्ते साधे बोलतही नाहीत. देगलूर- बिलोली तालुक्यातील नदी काठच्या गावांना चांगल्या रस्त्याची वाणवा आहे. रेती तस्कर दादागीरी करत गावकऱ्यांना बोलूही देत नाहीत. तस्करांच्या या गुंडागर्दीला राजकीय पक्षांचे पाठबळ मिळत आसल्याचा आरोप नेहमीच होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details