नांदेड - जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले असताना ग्रामविकास विभागाच्या पत्रामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाल्यामुळे ते कायम राहणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
१ हजार १५ ग्रामपंचायतींची निवडणूक
नांदेड जिल्ह्यात आगामी काळात १ हजार १५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील एक हजार ३०९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जिल्हा प्रशासनाने संबंधित तालुकास्तरावर जाहीर केले होते. त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीही सुरू केली होती. दरम्यान, परवाच राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी जिल्ह्यातील १ हजार १५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू केली होती. या निवडणुकांसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
निर्धारित कार्यक्रमानुसार निवडणुका पार पडणार...!
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची भेट घेतली असता त्यांनी जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाल्यामुळे पुन्हा सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार नाही. निर्धारित कार्यक्रमानुसार आपल्या निवडणुका पार पडणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.