नांदेड - शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने वाढत आहेत. नांदेड जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची तातडीची गरज भासत आहे. नांदेडमध्ये रेमडेसीवीरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा अन्न आणि औषध प्रशासनाकडून केला जातो. मुळात नांदेडमध्ये देखील रेमडेसीवीरचा काळा बाजार सुरू असल्याचे पोलिसांनी उघड केले. नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसीविरची विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात इंजेक्शन जप्त करण्यात आले.
स्थानीक गुन्हे शाखेने केला काळाबाजार उघड -
हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव आणि मनस्वी ऐजेसी संजीवनी हॉस्पिटल येथून हे चार आरोपी इंजेक्शन मिळवायचे आणि काळ्या बाजारात विक्री करायचे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा काळाबाजार उघड केला आहे.
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल -
स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जादा दराने रेमडेसीवीरची विक्री करणाऱ्या वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सात इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. या इंजेक्शनची किंमत जवळपास ३६ हजार ४०० रूपये एवढी होती. स्थानिक गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. मूळ किंमत कमी असताना रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल आठ हजार रुपयाला विक्री केले जात होते. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाचे माधव निमसे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.