नांदेड- अवैध दारू विकताना पकडून दिल्याच्या कारणावरून तरुणाला १२ जणांनी जबर मारहाण केली. ही घटना मुखेड तालुक्यातील मांजरी तांडा येथे घडली. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरुपती राठोड असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी मारला अवैध दारूवर छापा, 'खबरी'च्या संशयातून तरुणावर 12 जणांचा कत्ती, कोयत्याने 'हल्ला' - मांजरी तांडा
'आमची दारू का पकडून दिली ?' असे म्हणून घरात घुसून १२ जणांनी तरुणाला जबर मारहाण केली. लाकडी दांडक्यासह, कत्ती, कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. यावेळी त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली.
मांजरी तांडा येथील अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला होता. मात्र, गावातील तरुणानेच याबाबतची माहिती दिल्याचा संशय या दारूविक्रेत्यांना होता. त्यावरुन शनिवारी सायंकाळी संशयित आरोपींनी 'आमची दारू का पकडून दिली ?' असे म्हणून घरात घुसून तिरुपती राठोड व त्याच्या नातेवाईकांना अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्यासह, कत्ती, कुऱ्हाड आणि कोयत्याने मारुन गंभीर जखमी केले. यावेळी त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या दिघांना बाऱ्हाळी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याप्रकरणी तिरुपती राठोड यांच्या तक्रारीवरुन मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी बालाजी राठोड, मधुकर राठोड, सुधाकर राठोड, सुनील राठोड, अनिल राठोड, कपिल राठोड, विकास राठोड, शांताबाई राठोड, संगीताबाई राठोड, जयाबाई राठोड, कविता राठोड, यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार गोपीनाथ वाघमारे हे करत आहेत.