नांदेड - नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर असलेली रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी व त्या-त्या ठिकाणच्या जनतेला दळणवळणाच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने सर्व ठिकाणच्या भुयारी मार्गास मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP Prataprao Patil Chikhalikar) यांनी दिली. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.
डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, दिशा समितीचे सदस्य बालाजी पाटील पुणेगावकर, अनिल पाटील बोरगावकर, प्रकाश तोटावाड, शिरिष देशमुख गोरठेकर, सुनीताताई गणेशराव शिंदे, मारोती सुंकलवाड आदी सदस्य व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गासह ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या रेल्वे मार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलासह प्राधान्यक्रम देऊन तात्काळ कार्यवाही करू असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अश्वासीत केले आहे. केंद्रीय पातळीवरील नांदेड जिल्ह्यातील रस्ते वाहतूकीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल. याचबरोबर प्रदुषण मुक्त भारतासाठी नांदेड जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात घरगुती गॅस पाईप लाईनने जिल्ह्यातील 8 लाख कुटुंबांना जोडले जात असून यासाठी सुमारे 1200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या बैठकीत सांगितले.