नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे, वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नुकतेच केले होते. त्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी' मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत डोक्यावर फोटा न बांधण्याचा निर्णय घेतला होता. पंकजा ज्या पक्षात आहेत तिथे त्यांनी सुखी राहावे, प्रसंगी सासुरवास सहन करावा, सासुरवास सहनच झाला नाही तर, भावाच्या पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले असल्याचे जानकर म्हणाले.
पंकजा मुंडेंसाठी दरवाजे खुले : काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस (भारत राष्ट्र समिती) तथा एमआयएम पक्षाची मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याची चर्चा वेळोवेळी होत आहे. आता तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंसाठी भावाचे घर नेहमीच खुले असल्याचे वक्तव्य नांदेडमध्ये केले आहे. भाजपमध्ये सासुरवास होत असेल तर, त्यांनी भावाच्या घरी यावे. असा सल्ला महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंना दिला आहे.