नांदेड- शेतात काम करत असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यातील हाणेगाव जवळील शिळवणी शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळवणी येथील ३५ वर्षीय विवाहित महिला शेती काम करत होती. त्यावेळी नागेश मारोती नागुरे (वय 27) या आरोपीने पीडित महिलेजवळ येत अश्लील चाळे सुरू केले. आरोपीने महिलेवर जबरदस्ती करत शेजारच्या वसंत पाटमासे यांच्या शेतात नेऊन अत्याचार केला. पीडित महिलेने आरडोओरड केल्यानंतर पती आणि इतर व्यक्तींनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान आरोपी त्याठिकाणाहून पसार झाला. पीडित महिला, पती आणि नातेवाईकांनी लगेच मरखेल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केली.