नांदेड - राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रध्दा आहे. राम मंदिर आम्ही इतर धार्मिक स्थळी बांधा असे म्हणत नाही. राम हे देशातील प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूप्रमाणे, मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. १९४७ पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे. हिंदू आणि मुस्लीम यांचा डिएनए एकच आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनविण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते नांदेड येथे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर हा हिंदुस्थानवासीयांच्या श्रध्देचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे. तसे झाले नाही तर जनताच राम मंदिर बनवेल. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल’, असा विश्वास योगगुरु रामदेव बाबा यांनी आज येथे व्यक्त केला.