नांदेड - जिल्ह्यातील लोहा, कंधार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यात तीनजण वाहून गेले आहेत. लोहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावरगाव येथील एकाच कुटुंबातील दोन महिला बैलगाडीसह वाहून गेल्या. तर कोष्टेवाडी येथील एक व्यक्ती व कंधार तालुक्यातील गगनबेट येथील एक इसम पुरात वाहून गेला आहे.
पुरात दोन महिला आणि एक युवक गेले वाहून दोन महिला गेल्या वाहून -
लोहा तालुक्यातील सावरगाव, मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगा, चितळी, मुरंबी, आदी गावामध्ये धुवांधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. लोहा कंधार तालुक्यासह परिसरात झालेल्या ह्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्या मात्र दुथडी भरून वाहत आहे. या अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाच्या पाण्यात शेतीकाम आटोपून घराकडे परतणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन महिला बैलगाडीसह पुरात वाहून गेल्या आहेत.
बैलगाडी पलटी झाली -
सोमवारी अचानक झालेल्या या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे लोहा कंधार तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतातील काम आटोपून घराकडे परतत होते. दरम्यान नदी ओलांडून गावी येताना, अचानक नदीला पराच्या पाण्याचा लोट आला व या पुराचा लोटात बैलगाडी पलटी होऊन घरच्या दोन महिला वाहून गेल्या आहेत. सदर बैलगाडीमध्ये अमोल दगडगावे, भाऊ विवेक दगडगावे, पत्नी शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पाचजण होते. दरम्यान पाच पैकी तीन जणांना गावकऱ्यांकडून वाचवण्यात आले असून त्यातील मणकर्णाबाई बापुराव दगडगावे (वय ५२ वर्षे) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे (वय ४५) ह्या दोन्ही महिला वाहून गेल्या आहेत. सदर महिला ह्या वाहून जाऊन पालम तालुक्यातील पेंडू येथे त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.
कंधार तालुक्यात एक युवक वाहून गेला!
कंधार तालुक्यातील सव्वीस वर्षीय उमेश रामराव मदेबैनवाड (रा.गगनबेट) युवक गगनबेट ते गोरज रोडवरील पूल ओलांडताना वाहून गेला असून बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.