नांदेड - जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बाबतीत जनजागृती होणे आवश्यक असून प्रत्येक घरी स्वतःची जलबँक उभारावी. मी स्वतः माझ्या घरी रेन हार्वेस्टिंग केले असून तुम्हीही करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंगची पाहणी करतांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
जल जागृती मोहीमेच्या माध्यमातून प्रा. डॉ. परमेश्वर पौळ मागील अनेक वर्षांपासून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रत्येकांनी आपल्या घरात करावी. स्वतःची वॉटर बँक तयार करावी यासंदर्भात जनजागृती करत आहेत. या आठवड्यात नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. या कामातून जिल्हावासीयांना पुनर्भरणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नागरिकांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे जलपूनर्भरण करुन जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास पुढाकार घ्यावा, कारण जिल्ह्यात वारंवार अनियमीत पडणारा पाऊस, वाढती लोकसंख्या, वृक्ष तोड इत्यादी कारणांमूळे सततची पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत आहे. आजही भूजलाच्या अतिउपशामुळे आणि भूजलाचे योग्य प्रमाणत पुनर्भरण न झाल्यामुळे स्त्रोत कोरडे पडत आहेत. यामुळे शहरी व ग्रामिण भागातील पाणी टंचाईची परीस्थिती कायम राहते.
अनियमित पावसाबरोबरच पावसाळ्यातील पर्जन्याचे दिवसही कमी होत आहेत. यामुळे पाणी जमिनीत न मुरता भुपृष्ठावरूनच वाहून जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पावसाचा पडणारा थेंब अन् थेंब नियोजनपूर्वक जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. छतावर पाडणारे पावसाचे पाणी वाहून जात आहे, याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी छतावरील पडणारे पावसाचे पाणी जास्तीत-जास्त प्रमाणात जमिणीत मुरविणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. इमारतीच्या परिसरात एखादी विंधन विहिर किंवा विहिर असल्यास छतावरील पाणी खड्डा न घेता ही फिल्टर करून थेट विंधन विहिरीत किंवा विहिरीत सोडता येवू शकते. खड्डा करून पाणी फिल्टर करण्यासाठी खडी, वाळू, नारळाच्या काथ्या ईत्यादीचा उपयोग करता येवू शकतो. सध्या बाजारात पीव्हीसी पाईप पासून बनविले जाणारे फिल्टर देखील उपलब्ध आहेत. आज छतावरील पाऊस पाणी संकलन व पुनर्भरण करण्यासाठी सहज सोपे व कमी खर्चाचे तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध आहे.
गावातील व शहरातील प्रत्येक खाजगी इमारतीवरही छतावरील पाऊस पाणी संकलन, पुरर्भरणाची कामे करणे आता काळची गरज आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कामे केलेली नाहीत, अशा सर्व खाजगी अथवा शासकीय इमारतीवर छतावरील पाऊस पाणी संकलन व पुनर्भरण करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे.
जर पाच लोकांच्या कुटूंबाकरीता चार महिन्याचा टंचाई कालावधी (१२० दिवस) जर गृहीत धरला तर ८०० मि.मी पर्जन्यमान क्षेत्रात व ४०० चौ. फूट असणा-या छतावरून सुध्दा २४ हजार लिटर इतके पाणी संकलीत करता येवू शकते. या कालावधीत प्रती व्यक्ती ४० लिटर प्रती दिन असा वापर गृहीत धरला तरी टंचाई कालावधीवर मात करता येवू शकते अशी माहिती यावेळी देण्यात आली. यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा त्यांचा मानस आहे. अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.