नांदेड - जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांजरम, गडगा तसेच किनवटमधील गोकुंदा, पिंपळगाव, मांडवी व इतर परिसरात सोमवारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे शेतातील ज्वारी, भुईमुग आणि फळबागांचे नुकसान झाले. दरम्यान, मांजरम (ता. नायगाव) येथे वीज पडून म्हैस व तिचे पिल्लू दगावले.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह वार्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून नांदेड शहरात सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मात्र, पुन्हा कडक ऊन होती.
नायगाव तालुक्यात बरसला पाऊस
नांदेड शहरात सोमवारी सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. परंतू, पाऊस झाला नाही. तर, नायगाव तालुक्यातील माजंरम, गडगा येथे वादळी वार्यासह वीजांच्या कडकडाटात पावसाला सुरवात झाली. जवळपास साडेपाच पर्यंत पाऊस राहिला. यावेळी बारीक स्वरुपात गार देखील पडल्या. दरम्यान, माजंरम (ता. नायगाव) येथील शेतकरी रामदास श्रीराम शिंदे यांच्या शेतातील आखाड्यावर म्हैस व वगार बांधून होते. साडेपाचच्या दरम्यान वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. त्याचवेळी म्हैस व वगारवर वीज पडून जागीच ठार झाले. यात शेतकर्यांचे 70 हजाराचे नुकसान झाले. तसेच यावेळी तालुक्यातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. कंधार, माहूर, लोहा, धर्माबाद, मुखेड, भोकर या तालुक्यात आभाळ भरुन आले होते. त्यामुळे रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली होती.