नांदेड- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहूरगडावरील रेणुका देवीचे दर्शन घेतले. रेणुका माता आमची कुलस्वामिनी असून आपण नेहमीच नवरात्रीच्या पहिल्या माळेला माहूर गडावर दर्शनासाठी येत असतो. यावेळी नवरात्रात येणे न झाल्याने आता दर्शनाला हजेरी लावली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले, दरम्यान सुयय विखेंच्या भाजप प्रवेश आणि प्रचार बाबत विचारणा केली असता, देवीच्या ठिकाणी राजकीय विषय नको, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलणे टाळले.
विखे-पाटील यांनी मंगळावरी सकाळी १० वाजता माहूरगडावरील रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी रेणुकादेवी संस्थांनच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, समीर भोपी,अश्विन भोपी, शुभम भोपी,यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांची उपस्थिती होती. शेगाव येथील गजानन बाबाचे सकाळी आठ वाजता दर्शन घेऊन ते माहूर गडावर दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्या नंतर पत्रकारांनी विखे पाटील यांची संवाद साधला. राज्यात दुष्काळाचे सावट असून बळीराजा हवालदिल झाला आहे. दुष्काळ कायमचा हटला पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्ती मिळो, शेतकरी आत्महत्या टळो, असे साकडे रेणुका मातेला घातले असल्याचे विखे म्हणाले.