नांदेड - गेल्या दीड ते दोन वर्षापासून शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत. तरीही काही विद्यार्थी अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पूर्ण करत आहेत. यातून शिक्षणाविषयी शिक्षकांची धडपड व विद्यार्थ्यांची आवड दिसून येत आहे. ही संवाद प्रक्रिया शक्य झाली आहे ती म्हणजे उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांनी सुरू केलेल्या 'मुलांशी गप्पा' या सदरामुळे. या सदरातून शिक्षक राऊत यांनी नियमितपणे 'विद्यार्थ्यांशी गप्पा' मारत ज्ञानाचे धडे दिले आहेत. दहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या उपक्रमाची खुद्द पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कौतुकाची थाप दिली आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने संतोष राऊत यांच्या मुलांशी गप्पा या उपक्रमाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी सहशिक्षक संतोष राऊत यांचा काय आहे उपक्रम-
जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी (ता.अर्धापूर) येथे कार्यरत शिक्षक संतोष मारुतीराव राऊत यांनी लॉकडाऊन काळात मुलांशी गप्पा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविडच्या काळात 'वर्क फ्रॉम होम' करणारे शिक्षक संतोष राऊत यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी मुलांशी गप्पा हे ऑनलाईन सदर सुरू केले. यामाधम्यातून शिक्षक राऊत हे केवळ कारवाडी शाळेतील विद्यार्थी नाही तर राज्यातल्या १० जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून नियमित मार्गदर्शन करत आहेत.
जुलै २०२० पासून सुरू आहे हा उपक्रम...!
गेल्या वर्षी एप्रील 2020 मध्ये राज्यात आणि देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि टाळेबंदी लागली. शाळां बंद झाल्या. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी लॉकडाऊन उठवता आला नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. लॉकडाऊन परिस्थिती ऑनलाइन शिक्षणाचे आव्हान लक्षात घेऊन संतोष राऊत यांनी जुलै २०२० पासून दररोज सकाळी झूम व गुगल मीटिंगच्या मदतीने मुलाशी गप्पा हा उपक्रम सुरू केला. तो आजतागायत सुरु आहे.
लॉकडाऊनमध्ये अध्यापनासाठी 'मुलांशी गप्पा झुम आणि गुगल मीटिंगच्या माध्यमामातून राऊत ये दररोज सकाळी अर्धा तास योग सराव, त्यानंतर आठ ते नऊ या वेळेत शैक्षणिक अभ्यासाच्या तासिका, सायंकाळी एक तास माहिती तंत्रज्ञान तासिका घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. त्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी या गप्पामध्ये सहभागी झाले. राऊत यांच्या या उपक्रमामध्ये केवळ शैक्षणिक अभ्यास घेतला जात नसून मागील अनेक महिन्यापासून या समूहातील विद्यार्थी उत्तम तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक विद्यार्थी स्वतः झूम, गुगल मिट ची मीटिंग स्वतःहन घेत आहेत. एवढेच नव्हे तर इतरही अनेक अपची माहिती इतरांना मीटिंगमध्ये समजावून सांगत आहेत.
लॉकडाऊनमध्ये अध्यापनासाठी 'मुलांशी गप्पा २०० च्या वर टेस्ट- ऑनलाईन शिक्षण देत असताना केवळ अध्यापन न करता विद्यार्थ्यांचे अध्ययन कितपत झाले आहे, हे पडताळण्यासाठी राऊत यांनी त्यांच्या २०० च्या वर चाचणी परीक्षा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या चाचणी परीक्षा तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांनीच इतर विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या आहेत. विशेष सांगायचे तर प्रकाश चव्हाण सर नाशिक यांच्या मार्गदर्शक तासिकेतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचे अॅप बनवले आहेत, असा मुलांशी गप्पा समूह कोरोनाच्या लॉकडाऊन काळातील शिक्षणासाठी पालकांना मुलांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन-
अभ्यासाबरोबर विविध अप्सचे निर्माते, कवी, लेखक, गायक, सैनिक, वैमानिक, मंत्रालय कक्ष अधिकारी, चित्रपट कलाकार, लघुपट निर्माते, शिल्पकार, चित्रकार, पत्रकार शेतकरी, भजनी, मातीचे किल्ले निर्मिती करणारे अशा अनेक व्यक्तींच्या मुलाखती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करून पुस्तकाबाहेरचा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे. विना दप्तराची शाळा, बांधावरील शाळा आदी २८ उपक्रम, मुलांशी गप्पा आदी उपक्रम राबविले आहेत.
लॉकडाऊनमध्ये अध्यापनासाठी 'मुलांशी गप्पा शिक्षक संतोष राऊत यांच्या उपक्रमाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल-
पंतप्रधान कार्यालयाकडून या उपक्रमाची दखल घेत त्यांनी मेल पाठवून कौतूक केले आहे. माय गव्हर्नमेंट कडून त्यांना हा संदेश आला होता. त्यांनी आपल्याकडून चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची सविस्तर माहिती ही पाठवल्याचे उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांनी सांगितले.