मुंबई - कधी पावसाची अवकृपा, कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे दरवर्षी जणूकाही ठरलेलेत असते. यंदा मात्र, पेरणीपूर्वीच बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होणार, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. कोरोना संकटाच्या झळा शेतीला बसू नयेत म्हणून शेती संबधी व्यवसाय सुरू ठेवण्याचे धोरण सरकारने राबवले. मात्र, खरीप हंगाम तोंडावर असताना मागणीच्या तुलनेत केवळ १० ते २० टक्के खते आणि बियाणे बाजारात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सरकारकडून शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खतांचे वाटप झाल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या विषयीचा ईटीव्ही भारतने घेतलेला खास आढावा....
- राज्यातील खरिपाची परिस्थिती -
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात सोयाबीन बियाण्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बियाण्यासह इतर कोणतेही बियाणे आणि खते कमी पडू दिले जाणार नाहीत, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात सोयाबिन उबवन क्षमतेचे ६३ हजार प्रयोग झाले असून शेतकऱ्यांना घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे. या हंगामात २५ हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील. सिक्कीमच्या धर्तीवर राज्यात सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन करण्यात आले आहेत. - राज्यातील कृषि क्षेत्र -
- भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर
- लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर
- लागवडीखालील क्षेत्र
- खरीप : १४९.७ लाख हेक्टर;
- रब्बी : ५७ लाख हेक्टर
- कोरडवाहू क्षेत्र - ८१ टक्के
- एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी;
- लहान : २८.४० टक्के,
- सीमांत : ५१.१० टक्के
- सरासरी पर्जन्यमान : ११९८ मीमि.
- प्रमुख पिके :
- खरीप : भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर , कापूस, सोयाबीन, ऊस
- रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा
- खरीप हंगाम २०२० नियोजन -
- विविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर
- सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर
- बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल
- खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल (महाबीज- ५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.)
- खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर)साठी एकूण ४० लाख मेट्रीक टन खते मंजूर, खरीप २०१९ मध्ये ३३.२७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर.
- १७ मे २०२० पर्यंत खतांची उपलब्धता : २६.१३ लाख मेट्रीक टन, पैकी ७.१५ लाख मेट्रीक टन खतांची विक्री
- खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर आहे. एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.
- संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज ३.९१ लाख क्विंटल + राबिनि ०.२२ लाख क्विंटल + खासगी ७.११ लाख क्विंटल = एकूण ११.२४ लाख क्विंटल
राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. या क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता आहे. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केलेले आहे. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.
- खत पुरवठा नियोजन -
राज्यात एकूण ४० लाख मेट्रीक टन खताचे नियोजन आहे.
- खत विक्रेते- ४४ हजार १४५
- बियाणे विक्रेते- ३८ हजार ४७९
- किटकनाशके विक्रेते- ३५ हजार ८४१
- गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने भरारी पथकांची स्थापना -
प्रत्येक जिल्हास्तरावर एक याप्रमाणे एकूण ३५ पथके, प्रत्येक उपविभागस्तरावर ९०, तालुकास्तरावर ३५१, राज्यस्तरावर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी १७ हजार ११४ शेतकरी गट कार्यरत आहेत.
- ठाणे विभाग - ५६७
- कोल्हापूर विभाग- १७६६
- नाशिक विभाग- १२०१
- पुणे विभाग- ४४५२
- औरंगाबाद विभाग- ९८९
- लातूर विभाग- १६६८
- अमरावती विभाग- १९४८
- नागपूर विभाग- ४५२३
- सोलापुरात 2 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन; शेतकऱ्यांच्या बांधावर खत, बियाणांचे वाटप'
सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 लाख 73 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांच्या बांधावर 22 हजार क्विंटल खत आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे. हे खत आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना देण्यात आले आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे व खताचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केल्या होत्या. त्यानंतर खरीपाचे नियोजन म्हणून 7 हजार 471 शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन खताचा आणि बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर 22170 क्विंटल खताचे आणि 171 क्विंटल बियाणे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे हे उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 8 हजार 485 कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व बियाण्यांची उपलब्धता करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपासाठी 2 लाख 11 हजार 390 टन रासायनिक खतांचा पूरवठा करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यापैकी आतापर्यंत 43 हजार 59 टन रासायनिक खताचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच खासगी कंपन्या व महाबीजमार्फत 31 हजार 998 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम -
जिल्ह्यात 2.73 लाख हेकटर खरीप पेरणी नियोजन आहे.
- प्रामुख्याने बाजरी, मका, तूर, उडिद, सोयाबीन, मूग, सूर्यफुल पिकांचा समावेश आहे.
- खासगी कंपन्या व महाबीजमार्फत 31998 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार.
- रासायनिक खते 2,11,390 मेट्रीक टनपैकी 43059 मेट्रीक टन पुरवठा झाला.
- पीक कर्ज वाटप 1438.41 कोटीचे उद्दिष्ट आहे, आतापर्यंत 116.10 कोटी रुपये वाटप
- भंडाऱ्यात खरिपात बियाणे, खतांची टंचाई नाही; मात्र कोरोनामुळे महाबीजची बिजाई निर्मिती घटली
खरीप हंगाम 2020-21 पुढच्या 15 दिवसात सुरू होणार आहे. यावर्षी भंडारा जिल्ह्यात एक लाख 94 हजार हेक्टरवर भाताची, 1 हजार 200 हेक्टरवर तुरीची आणि 550 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे महाबीज आणि खाजगी कंपनीतर्फे पुरविले जाणार आहेत. यातील जवळपास 80 टक्के बियाणे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे, बियाणांची कमतरता पडणार नाही आणि कृषी केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आत्माद्वारे बनविलेल्या शेतकरी गटामार्फतच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बियाणे पोहोचवले जाणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी 67 हजार मेट्रिक टन खतांची मागणी आहे. यापैकी 40 हजार मेट्रिक टन खते सध्या उपलब्ध असल्याने खतांची टंचाई निर्माण होणार नाही. तसेच जिल्हा स्तरावर आणि तालुकास्तरावर भरारी पथके निर्माण केली आहेत. तसेच, बोगस बियाणे कुठेही जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.
मागणीनुसार प्रमाणित बियाणे पुरवठा करणारी शासकीय यंत्रणा म्हणजे महाबीज. महाबीजने मागच्या वर्षी ठोकळ आणि मध्यम वाणाचे 6 हजार 274 क्विंटल बियाणे विकले होते. तर, यावर्षी 16 हजार 54 क्विंटल बियाणांची मागणी होती. सध्या 3 हजार 634 क्विंटल म्हणजे केवळ 58 टक्के ठोकळ वाणाचे बियाणे पुरविल्या जात आहे. तर, बारीक वाणात 875 क्विंटल बियाणांची विक्री मागच्या वर्षी केली गेली होती. यावर्षी 914 क्विंटलची मागणी होती. यापैकी 865 क्विंटल म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 99 टक्के पुरवठा केला गेला आहे.
- नाशिक जिल्ह्यातील 1678 गावात 5.76 लाख हेक्टरवर होणार खरीप पिकाची लागवड
जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1678 गावात असलेल्या 5.76 लाख हेक्टरवर होणार खरीप पिकाची लागवड केली जाणार आहे. तर सर्वाधिक 35 टक्के लागवड ही मका पिकाची होईल. शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचा तुटवडा जाणवणार नसल्याचे नियोजन कृषी विभागाने केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 15.58 लाख असून जिल्ह्यातील 15 तालुक्यात एकूण 1961 इतकी गावे आहेत. त्यापैकी यावर्षी 1678 गावात खरीप पिकाची लागवड केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी 5.76 लाख हेक्टरवर ही लागवड केली जाणार असून यात सर्वधिक 35 टक्के मकाचे उत्पादन घेतले जाणार आहे. त्या पाठोपाठ बाजरी 16 टक्के, भात 14 टक्के, सोयाबीन 12 टक्के तसेच 45 हजार हेक्टरवर कापसाचे उत्पादन घेतले जाणार आहे.
सोयाबीन बियांणाचा तुटवडा...
यंदा खरीप पिकासाठी 97 हजार 600 क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. आतापर्यंत 60 हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध असून, मागील वर्षी पाऊस उशिरा झाल्याने यंदा सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. यावर्षी 22 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज असून आतापर्यंत कृषी विभागाने 11 हजार क्विंटल सोयाबीनचे नियोजन केले आहे.
- जालन्यातील खरीप पेरणीची तयारी पूर्ण; सोयाबीन बियाणांच्या किमतीत वाढ
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकरी आणि खते, बी-बियाणे पुरविणारे प्रशासन दोघेही सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या बियाणांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली झाली आहे. गेल्या वर्षी 30 किलो सोयाबीनची बॅग 1 हजार 950 रुपये म्हणजेच 65 रुपये किलोप्रमाणे मिळत होती. तर, यावर्षी दर वाढून ही बॅग 2 हजार 220 रुपयांना मिळत आहे.
जालना जिल्ह्यामध्ये 5 लाख 32 हजार 500 हेक्टर हे सरासरी क्षेत्र ग्राह्य धरले आहे. या क्षेत्रामध्ये महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस हे 2 लाख 98 हजार 750 हेक्टरवर तर, सोयाबीन 1 लाख 35 हजार 750 हेक्टरवर प्रस्तावित आहे. त्यापाठोपाठ मका 54 हजार, तुर 47 हजार, मुग 22 हजार, संकरित बाजरी 70 हजार, उडीद 11 हजार, भुईमूग 1हजार, संकरित ज्वारी 135 हेक्टर याप्रमाणे प्रस्तावित आहे. खतांमध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या डीएपी, एनपीके, युरिया अशा सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता प्रशासनाच्यावतीने करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खताची टंचाई नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कसल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
- लातुरात ना खतांचा साठा, ना बियाणांचा पुरवठा; जिल्ह्यातील खरीप धोक्यात