नांदेड -आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने नांदेडमध्येही प्रहारच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले, यावेळी परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील झाले होते.
नांदेडमध्ये 'प्रहार' चे शेतकऱ्यांसाठी जेलभरो आंदोलन बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरूवात
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड रेल्वेस्थानक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात करण्यात आली. यानंतर आंबेडकर स्मारक ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
- पेरणी, कापणी पर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी
- पीक विम्याची रक्कम खात्रीने देण्यात यावी
- घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील दुष्काळी अनुदान द्यावे
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी करावी
- आदिवासींचे प्रलंबित वनहक्क त्वरित वाटप करावेत
- स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजूर व कामगारांचाही समावेश करावा
- कांदा, तूर, ऊस उत्पादकांना जाहीर केलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे
- दुबार पेरणीसीठी शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे किंवा आर्थिक मदत देण्यात यावी
- निराधार विधवा भगिनींना दहा हजार रुपयांची भाऊबीज भेट द्यावी
वरील प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांचे निवेदन पत्र यावेळी नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. जिल्ह्यातील शेतकरी, विधवा महिला, निराधार महिला यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रहारचे जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले होते.