नांदेड - नागपूर महामार्गावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून वाहनचालक प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गाकडे सर्वांनीच पाठ फिरवल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी, वाहन चालकांनी उपस्थित केला.
नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. हिंगोली, नागपूर, मुंबई लातूर, औरंगाबाद, हैदराबाद इत्यादी मोठ्या शहरांना जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. जड वाहनांची संख्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये धान्य, खते, सिमेंट, वाळू इत्यादी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. परिणामी, या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत. अशा या वर्दळीच्या मार्गावर गेल्या काही दिवसापासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चालक वैतागले आहेत, अपघातातही वाढ झाली असून संबंधितांनी लक्ष देऊन महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.