नांदेड -पिंपरी महिपाल येथील पारधी कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याने या कुटुंबातील महिलेचा गर्भपात झाल्याचा प्रकार 20 जूनला घडला होता. गावकर्यांच्या सांगण्यावरून प्रवाशी वाहनधारकांनी संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यास नकार दिला होता. याप्रकरणाचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या सुचनेवरुन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरतकुमार मुदीराज यांच्यासह लिंबगाव पोलीस स्थानकाचे अधिकारी, कर्मचार्यांनी पिंपरी महिपाल येथे जावून पारधी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: नांदेड बहिष्कार प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल; चौकशीचे आश्वासन - promise investigation
गावकर्यांच्या सांगण्यावरून प्रवाशी वाहनधारकांनी पिंपरी महिपाल येथील पारधी कुटुबीयांवर बहिष्कार टाकल्याने एका महिलेचा गर्भपात झाल्याचा प्रकार 20 जूनला घडला होता. याप्रकरणाचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर याप्रकरणाची दखल पोलीस अधिक्षकांनी घेतली आहे.
पिंपरी महिपाल येथून वसमत तसेच नांदेड मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्या वाहनधारकांनी मंगलाबाई पवार यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मंगलाबाई जवळपास 6 किलोमीटर पायी चालल्याने त्यांचा गर्भपात झाल्याचा प्रकार घडला होता. गावकर्यांच्या दबावामुळे प्रवाशी वाहनधारकांनी देखील पारधी कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्याने या गर्भपातास गावकरी जबाबदार असल्याची तक्रार मंगलाबाई पवार यांच्यासह पारधी महासंघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शिला शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
याप्ररणाची दखल घेत 'ईटीव्ही भारत'ने हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी पिंपरी महिपाल येथे जाऊन पारधी कुटुंबीय तसेच गावकर्यांची भेट घेतली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भरतकुमार मुदीराज यांनीही पिंपरी महिपाल येथे जावून गावकरी तसेच प्रवासी वाहनधारक व पारधी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.