नांदेड - जिल्ह्यातील किनवट येथून १० किमी अंतरावर असलेल्या दाभाडी येथे वाळू तस्करांनी चक्क किनवट पोलीस ठाण्याच्या चार कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्या कर्मचाऱ्यास नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
वाळू माफियांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला; एक पोलीस गंभीर जखमी - नांदेड वाळू माफियांचा हल्ला
वाळूचा उपसा होत असताना देखील महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते. मात्र, पोलिसांना मारहाण झाल्याचे समजताच महसूल विभागाला जाग आली आणि त्यांनी १०० ब्रास वाळूचा साठा जप्त केला.
किनवट पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी गजानन चौधरी, सुरेश पुलगुटे, अप्पाराव राठोड व अन्य एक कर्मचारी, असे चार जण दाभाडी येथे गस्तीवर गेले होते. यावेळी वाळू तस्करांनी त्यांच्यावर अचानकपणे लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेतले. ही घटना कळल्यानंतर किनवट ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोरात हे अन्य कर्मचारी घेऊन दाभाडी येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासमोरच एका पोलिसाला मारहाण करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षकासोबतही झटापट झाली. स्थिती अधिकच गंभीर होत असल्याने मांडवी, सिंदखेड, माहूर व इस्लापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दाभाडी येथे रवाना करण्यात आले. अप्पाराव राठोड यांना वाळू तस्करांनी जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे .
दरम्यान, वाळूचा उपसा होत असताना देखील महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते. मात्र, पोलिसांना मारहाण झाल्याचे समजताच महसूल विभागाला जाग आली आणि त्यांनी १०० ब्रास वाळूचा साठा जप्त केला.