नांदेड - कोट्यावधी रुपयांची औषधे लांबविणारा कंटेनर चालक आणि सहचालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. २ दिवसांपूर्वी औषधे आणि इतर साहित्याने भरलेला कंटेनर घेऊन हा चालक फरार झाला होता. त्यानंतर २ दिवसांतच पोलिसांनी या आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
एक कंटेनर औषधे, वीजपंप, पावडर आणि इतर साहित्य घेऊन चेन्नईहून अंबालाकडे (हिमाचल प्रदेश) निघाला होता. नागपूर येथील टीसीआय एक्सप्रेस या वाहतूक कंपनीमार्फत ही डिलिव्हरी देण्यात येणार होती. मात्र, चालकाला त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आमिष देऊन तो कंटेनर दुसऱ्या मार्गाने नेण्यास सांगितले. यानंतर त्याच्या मित्रांनी कंटेनरमधील औषधी लांबविली.
जप्त केलेल्या ऐवजासह पोलीस या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात कंटेनरमधील तब्बल १ कोटी १७ लाख ११ हजार २६८ रुपयांची औषधे शिरपूर तालुक्यातील मांडळमधील अरुणावती नदीत फेकल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पाठलाग सुरू केला असता त्यांना हा कंटेनर म्हसावद (ता. शहादा ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिकाम्या अवस्थेत आढळून आला. या कंटेनरमधील औषधांचा साठा शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील एका शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत या ठिकाणाहून एका शेतातील गोदामात औषधे आणि इतर साहित्य आढळून आले. वस्तूंची खात्री केल्यावर हा चोरीतील मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चालक आणि सहचालकाला अटक केली असून यातील अन्य ६ जण फरार झाले आहेत.