नांदेड - लोहा तालुक्यातील सोनखेड येथील ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव सुग्रीव उर्फ बाबुराव भुजंगराव मोरे (वय-२८, राहणार महादेव गल्ली सोनखेड) असे आहे.
सोनखेड अत्याचार प्रकरणातील नराधमास अटक सोनखेड येथील ५ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेल्या २ दिवसांपूर्वी उघड झाली होता. या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा हादरला असून महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे समोर आले आहे. सोनखेड येथील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते.
हेही वाचा -नांदेडमध्ये पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार, अज्ञात नराधमावर गुन्हा दाखल
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनखेड पोलिसांच्या माध्यमातून नराधम सुग्रीव याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पथकाने परिसरात तपास सुरू केला असता नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमुकलीचे शोषण करणार्या या नराधमास फासावर लटकवा, अशी मागणी करण्यात आली आहे. या अत्याचाराच्या घटनेविरुद्ध गेल्या २ दिवसांपासून सोनखेडची बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. नांदेड शहरातील सिडको-हडको परिसरातही गुरुवारी बंद पुकारण्यात आला होता.
हेही वाचा -वृद्ध महिलेचा खून करून दागिने लंपास; नांदेडच्या उमरीतील घटना