नांदेड - वाळूचोरी थांबवण्यासाठी असर्जन व कौठा भागातील नदीपात्रात महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून शंभरच्यावर वाळूच्या बोटी जाळून नष्ट केल्या. उशीराने का होईना जाग आलेले पथक गोदापात्रात उतरले. मात्र, मुद्देमाल वगळता एकही वाळूचोर पथकाला आढळून आला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नांदेडमध्ये वाळू माफियांवर धडक कारवाई, १०० वाळू बोटी केल्या नष्ट - वाळूच्या बोटी केल्या नष्ट
असर्जन व कौठा भागातील नदीपात्रात महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून शंभरच्यावर वाळूच्या बोटी जाळून नष्ट केल्या आहेत. मुद्देमाल जरी पोलिसांच्या हाती लागला असला तरी एकही वाळूचोर पथकाला आढळून आला नाही.

जिल्ह्यात वाळूचोरांचे जाळे घट्टपणे विणलेले आहे. तालुका नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पात्रातून रात्रंदिवस हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना हदगाव तालुक्यातील उंचाडा शिवारात नुकतीच घडली. तसेच कारवाईसाठी कौठा भागात गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनांवर दगडफेक करत पथकातील कर्मचाऱ्यांना वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली होती. यावरुन वाळू व्यवसायात गुंडांचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. अर्थात हे सर्व राजकीय पाठबळाशिवाय होणे शक्य नाही. वाळूचे दर गगनाला भिडल्याने वाळू उपशातून मिळणारा लाखोंचा नफा मिळवण्यासाठी अनेकजण या व्यवसायात गुंतले आहेत. वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून अधून-मधून धाडसत्र राबविले जाते. मात्र, कारवाई झाली की काही दिवस थांबायचे व पुन्हा नव्या जोमाने उपसा करण्यासाठी पुढे यायचे असा काहीसा पायंडा जिल्ह्यात रुढ होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी पदभार स्वीकारताच यंत्रणा प्रमुखांची बैठक घेवून वाळू चोरीवर आळा घालण्याचे सूचित केले होते. त्यानुसार आपण किती कार्यक्षम आहोत हे दर्शविण्यासाठी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तहसील कार्यायाचे पथक २६ फेब्रुवारी सायंकाळी असर्जन भागातील गोदापात्रात उतरले. काकणाई व महाराज धक्क्यावर उपसा केलेली वाळू, तसेच शंभरच्या वाळूच्या बोटी जाळल्या आहेत. उपसाकामी वापरात असलेले अन्य साहित्यही पथकाने जप्त केले. पात्रालगत वाळूची ढिगारेही पथकाला आढळून आले. कारवाईत सहभाग घेतलेल्या पथकात उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, प्रभारी तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी के एम. नगरवाड, अनिल धुळगुंडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश होता.