नांदेड- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेले आहे. तर, आता मोठ्या प्रमाणात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे, कापसाचे नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे.
कापसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडली आहेत. खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून कापूस पिकावर शेतकरी अवलंबून असतात. मात्र, बोंडअळीने कापसावर हल्ला केला. त्यामुळे, शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच
पीक व्यवस्थापनाविषयी अपुरे ज्ञान व त्यात कृषी विभागाची शेतकऱ्यांप्रती उदासिनता हे पीक नुकसानीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, बोगस बिटी बियाण्यांमुळेही नुकसान झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे, यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे.
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात- जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे
जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर महिन्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी असतो. नोव्हेंबर महिन्यातील वातावरण हे गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून फेरोमन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. ३.५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाँडिरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम) ५० मिली, किंवा ०.१५ टक्के (१५०० पीपीएम) २५ मिली प्रति १० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील दिवसात गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
हेही वाचा-नांदेड जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशाच्या खाली; एक हजार ५६२ गावांचा समावेश