नांदेड: जिल्ह्यातील नरसी इथल्या पेट्रोल पंप चालकाच्या बँक खात्यात नजरचुकीने दीड कोटी रुपये आले होते. त्या कंपनीचे हे पैसे होते त्या कंपनीने पेट्रोल पंपाच्या मालकाला झालेली चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर पेट्रोल पंपाचे मालक असलेले पाटील यांनी ही रक्कम कंपनीकडे परत पाठवलीय. आर्थिक व्यवहारात पाटील यांनी दाखवलेली प्रामाणिकता सध्या नांदेडमध्ये चर्चेचा विषय ठरलीय.
मॅसेज आला आणि धक्काच बसला: चंद्रकांत पाटील हे पेट्रोल पंप चालक असून त्यांचे नरसी येथे पेट्रोल पंप आहें. पेट्रोल पंपाचा व्यवसाय असल्याने दररोज ऑनलाईन व्यवहार करत असतात. 31 मार्च रोजी त्यांच्या मोबाईलमध्ये कोणार्क इंटर प्राईजेस नावाच्या कंपनीचा एसएमएस आला आणि तो एसएमएस होता बँकेच्या खात्यात दीड कोटी रुपये जमा झाल्याचा. खात्यात तब्ब्ल दीड कोटी रुपये आल्याचा मॅसेज वाचून त्यांना देखील सुरुवातीला धक्काच बसला. मात्र सध्या सुरू असलेल्या फसवेगिरीमुळे हा मॅसेज देखील फ्रॉड असल्याचे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र बँकेच्या खात्यात पैसे जमा झाल्याने चंद्रकांत पाटील यांना सुखद धक्का बसला. थोड्या वेळानंतर कंपनीच्या अधिकाऱ्याचा त्यांना फोन आला आणि नजरचुकीने तुमच्या बँक खात्यात दीड कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर चंद्रकांत यांनी मनात कुठली ही लालसा न ठेवता शहानिशा करून काही क्षणातच बँक खात्यात आलेले दीड कोटी रुपये परत करण्याची हमी दिली. 1 एप्रिल रोजी बँका बंद होत्या. त्यानंतर त्यांनी 2 एप्रिल रोजी आरटीजीएस प्रणालीद्वारे त्यांनी दीड कोटी रुपये परत पाठवले.