महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात शेतीसंबंधी वाहतूक सेवा 'या' वेळेत राहणार सुरू - Kharip crop season start

राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेती संबंधित येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यादृष्टीने विचार करण्यात आला.

शेतीसंबंधी वाहतूक सेवा 'या' वेळेत राहणार सुरू
शेतीसंबंधी वाहतूक सेवा 'या' वेळेत राहणार सुरू

By

Published : May 7, 2021, 8:09 AM IST

नांदेड - जिल्ह्यात कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती विषयक सेवा देण्यात येणारी वाहतूक चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या काळात ही परवानगी आहे. यामध्ये कृषि सेवा केंद्रातील बियाणे, खते, किटकनाशके, कृषि साहित्य वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.


खरीप हंगामाच्या दृष्टीने घेतला निर्णय-

राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेती संबंधित येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यादृष्टीने विचार करण्यात आला. त्यानुसार कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती संबंधी कार्य, उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषिक्षेत्राचे अखंडीत सातत्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला.

मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक-

या सेवा सुरू ठेवताना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपली व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details