नांदेड -लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे धर्माबाद तालुक्यातील जनतेनी लोकसहभागातून अशा लोकांना जेवण पुरवले. व्यापारी सुबोध काकाणी यांच्या पुढाकाराने गेल्या ३२ दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने आजचे जेवण देऊन हे अन्नछत्र बंद करण्यात आले.
धर्माबादेत लोकसहभागातून तब्बल ३२ दिवस गरजूंना पुरवले अन्न - धर्मबाद नांदेड लेटेस्ट न्युज
लॉकडाऊनच्या काळात सर्वच कामधंदे बंद पडल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होऊ लागले होते. येथील व्यापारी सुबोध काकाणी यांनी 'आपल्या गावकऱ्यांचे किचन' हा उपक्रम सुरू केला.
लॉकडाऊनच्या काळात सर्वच कामधंदे बंद पडल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होऊ लागले होते. येथील व्यापारी सुबोध काकाणी यांनी 'आपल्या गावकऱ्यांचे किचन' हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला काकाणी यांनी शहरातील गोरगरिबांना जेवण देण्यास सुरुवात केली. मात्र, ग्रामीण भागात लोकांचे हाल सुरू झाले होते. हे पाहून काकाणी यांनी शहरातील सर्व लोकांना आवाहन करून मदतीची विनंती केली. काकाणी यांची समाजसेवा लोकांना माहित असल्याने अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केले. कुणी श्रमदानास तयार झाले, तर कुणी देणगी देण्यास पुढे आले. महिलांनी देखील स्वयंपाक बनवण्यासाठी पुढाकार घेत श्रमदान केले. संपूर्णपणे लोकसहभागातून सुरू झालेल्या या अन्नछत्राने तब्बल 32 दिवस गरजूंना जेवण दिले आहे.
अनेकांनी मिळून उपक्रमासाठी 45 लाख रुपये देणगी दिली. त्यातून सलगपणे 32 दिवस सहा लाख लोकांना जेवणाची पाकिटे तयार करून पुरवण्यात आली आहेत. हा उपक्रम राबवत असताना तालुक्यातील प्रत्येकांनी आपला खारीचा का होईना वाटा उचलला. त्यामुळेच कडक लॉकडाऊनच्या काळात हे अन्नछत्र 32 दिवस चालू ठेवण्यात आले. आजपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून गरजू मंडळींनी आता जेवणाची मागणी थांबवली. अनेक उद्योगधंदे सुरू होत असल्याने गरजू लोकांच्या हाताला काम मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 32 दिवसापासून सुरू असलेले हे अन्नछत्र आजचे जेवण देऊन बंद करण्यात आले. गेल्या 32 दिवसांच्या काळात धर्माबादकरांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. जातीपातीच्या पुढे जाऊन प्रत्येक जण या अन्नछत्रात सेवा देत होता. त्यामुळे कोरोनासारख्या संकटात एकजुटीची भावना निर्माण झाली आहे.