नांदेड- संपूर्ण देश इंग्रजांच्या राजवटीतून 15 ऑगस्ट 1947ला मुक्त झाला होता. पण मराठवाड्याचा परिसर निजाम राजवटीतच होता. या पाशातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मोठी चळवळ उभी केली. या चळवळीचे एक केंद्र म्हणजे पाटनूरचे जंगल हे होय. या भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी इथूनच मोठी चळवळ उभी केली. आज या ठिकाणी असलेले स्वातंत्र्यवीरांचे स्मारकही आठवण ताजी ठेवते. या परिसराला ऐतिहासिक पराक्रमाची व राजकीय दूरदृष्टी आहे, असे आपणास दिसून येते.
१५ ऑगस्ट १९४७ ला सुमारे १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत देश स्वतंत्र झाला. पण या स्वातंत्र्याचा आनंदापासून मराठवाड्यातील जनता ही अलिप्त होती. स्वातंत्र्याच्या अगोदर देशामध्ये जवळपास ५५० संस्थानिक त्यांचे स्वत: चे राज्य मर्जीप्रमाणे चालवत होते. स्वातंत्र्यानंतर देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी ही संस्थाने खालसा केली; परंतु काही मुजोर राजांनी हा आदेश न मानता राज्यातील जनतेला त्रास देत पिळवणुकीने राजकारण करण्यास सुरुवात केली. यामध्ये हैदराबादचा राजा निजामशाह याचा सुद्धा समावेश होता. येथील जनतेला त्याने धार्मिक द्वेष राजकारण करून वेठीस धरले होते. मन मानेल त्या पद्धतीने जनतेला तो छळत होता. लोकांना शिक्षण नाही, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य नाही. वर्तमानपत्रे नाही, नागरी स्वातंत्र्याची पूर्ण गळचेपी, अरबांना राज्यात नियमितपणे बाहेरून अपमानाचे धोरण व त्यांना मूल झाले की, प्रोत्साहन भत्ता अशी अनेक जुलमी धोरणाने येथील जनता कंटाळून गेली होती.
सर्व सरकारी शाळांमधून मुस्लीम धार्मिक शिक्षणपद्धती अंमलात येत होती. १९२९ साली निजामाने एक फर्मान काढून सर्व सामाजिक आंदोलनावर बंदी आणली होती. यास थोडाही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यास वेळीच बंदोबस्त केला जात असे. व्यायामशाळा, आखाडे यावरसुद्धा बंदी होती, अशा जुलमी राजवटीच्या विरोधात कै. गोविंदभाई श्रॉफ आ. कृ. वाघमारे, अनंत भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिक भूमिपूत्रांनी उग्र अशा आंदोलनामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कै. श्यामरावजी बोधनकर, कै. कल्पना नपरीस्वाया, आबासाहेब लहानकर, कै. साहेबरावजी बारडकर, कै. राजारामजी देशमुख यांनी आपल्या बहाद्दर मावळ्यांना सोबत घेऊन निजामविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले व आंदोलनाला एक प्रेरणास्तोत निर्माण केले. त्यावेळेस जिल्ह्यातील लहान, नागेली, बारड, पाटनूर, चिदगिरी, चिकाळा, कोळी, डोरली अशी अनेक गावे ही रणसंग्रामाची केंद्रे बनली होती.
निजामाच्या दडपशाहीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी या भागातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आंदोलनामध्ये स्वत: ला झोकून दिले. परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढ्यामध्ये भाग घेतला व धाडसाने अनेक घटनांच्या माध्यमाने निजामशाही हादरून सोडली. त्यात उमरी बँक अॅक्शन, पाटनूरचा जंगल सत्याग्रह , इस्लापूर पोलीस स्टेशन हल्ला, कोळी कॅम्पवर हल्ला, उमरखेड कॅम्प, असे विविध रणसंग्राम गाजवले.
उमरी बँक दरोडा प्रकरण