नांदेड -जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभेचे आमदार असलेले प्रतापराव पाटील-चिखलीकर हे सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. चिखलीकरांच्या या जागेवर त्यांचे मेहुणे आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे., तर दुसरीकडे खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील-चिखलीकर यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्यामुळे, भाजपकडून उमेदवारीसाठी चिखलीकर कुटुंबातच गृहकलह सुरू झाल्याचे चित्र आहे. यामुळे या दाजी भावजीच्या रस्सीखेचात उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोहा-कंधार मतदारसंघाचा राजकीय इतिहास
स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई होत असे. एकेकाळी विधानभवन गाजवणारे भाई केशवराव धोंडगे, यांचा मतदारसंघ म्हणून लोहा-कंधारची ओळख आहे.
हेही वाचा... बीडच्या राजकारणात महिलांचा दबदबा; प्रश्न मात्र आजही कायम
२००४ साली या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले होते. तिथपासून चिखलीकर यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले होते. धोंडगे यांनी पाटील यांचा केवळ नऊ हजार मताने पराभव केला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेकडून प्रताप पाटील आणि भाजपकडून मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते. यावेळी मात्र ४५ हजारांचे मताधिक्य घेत प्रतापराव पाटील विजयी झाले.
लोहा-कंधार हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभेत येतो. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. यावेळी लोहा-कंधारचे आमदार असलेले प्रताप पाटील-चिखलीकर हेच नांदेडचे खासदार म्हणून नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे आता प्रतापरावांच्या अनुपस्थितीत लोहा-कंधार विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लोहा कंधारमध्ये भाजपकडून पाटील यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र भाजपकडून श्यामसुंदर शिंदे, प्रणिता देवरे यांचीही नावे चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये आणि खासदार चिखलीकर यांच्यामध्ये चांगलेच वाक्-युद्ध पेटल्याचे चित्र आहे. खुद्द पाटील यांनी मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हेही वाचा... श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?