नांदेड : टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेमच्या काळात वाचक अदृश्य होत चालला आहे. त्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी. तसेच वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी वृक्षराजींच्या सान्निध्यात मुक्त वाचनालय हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पुस्तक हे मस्तक घडविण्याचे काम करते. वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावत असतात. समाजात वाचन संस्कृतीचा परिपोष होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शालेय पातळीवर गोष्टींचा वार शनिवार, वाचन प्रेरणा दिवस, खाऊ प्रकल्प, लेखन वाचन हमी कार्यक्रम, वाचनालय शाळेच्या दारी, असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचे उद्देश वेगवेगळे असले तरीही वाचक निर्माण करणे, हे उद्दिष्ट असते
दीडतासांचा अनोखा उपक्रम : शालेय परिसरात वृक्षराजींच्या सान्निध्यात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सदस्य आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनिषा गच्चे यांच्या सहकार्याने मुक्त वाचनालय हा दीडतासांचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे स्वागत केंद्रप्रमुख नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक शिक्षणविस्तार आंबलवाड,आनंदा नरवाडे, अधिकारी सरस्वती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास 7 गोडबोले आदींनी केले आहे.
'असा' आहे उपक्रम :विद्यार्थी झाडांच्या सावलीत बसून सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या उपक्रमात सहभागी होतात. कोणतेही आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. तसेच वाचन झाल्यावर ते परत ठेवून देतात. शाळेच्या प्रांगणातील झाडांना दोरी बांधून त्यास गोष्टींची, शूरविरांची, थोर महापुरुषांची चरित्रे, वैज्ञानिकांची पुस्तके आदी विविध प्रकारची पुस्तके डकविण्यात येतात. ही प्रक्रिया सतत दीड तास चालते, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थीही यात सहभागी होत आहेत.