नांदेड - शहरात मंगळवारी एकाच दिवशी ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४९ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच अबचलनगर येथील रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर तो कोरोनामुक्त झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकूण 63 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे, तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले हे रुग्ण रक्तदाव, मधुमेह या आजाराने बाधित होते.