नांदेड -महावितरणच्या कारभाराचा फटका सिडकोतील एका सामान्य वीज ग्राहकाला बसला आहे. अवघ्या १५० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या या वीज ग्राहकाला महावितरणाने एका महिन्याचे चक्क दीड लाखांचे वीजबिल पाठवले आहे. १० बाय १५ च्या सिडकोच्या या घरात एक पंखा, टीव्ही, फ्रीज अशी वीजेवर चालणारी मोजकीच उपकरणे असून वीजेचे बिल मात्र १ लाख ५८ हजार आल्याने या वीज ग्राहकाला जोरदार झटका बसला आहे.
अधिक माहिती अशी, की सिडको भागातील संभाजी चौकात ध्रुपदा धुळे हे आपल्या कुटुंबासह सिडकोच्या अवघ्या १५० चौरस फुट घरात राहतात. घरात वीजेवर चालणाऱ्या उपकरणात एक टिव्ही, एक पंखा, फ्रीज एवढ्याच वस्तू आहेत. त्यातही दिवसभर घरातील मंडळी आपआपल्या कामानिमित्त बाहेर असल्याने पंखा आणि टीव्हीचा वापरही मर्यादित होतो. असे असले तरी, त्यांना महावितरणाने एका महिन्याचे चक्क १ लाख ५८ हजार रुपये वीजबिल पाठविले आहे. विशेष म्हणजे या भागातील अनेक वीज ग्राहकांना असेच अव्वाच्या सव्वा वीजबिल आले आहे.
सिडको-हडको भागात प्रामुख्याने नोकरदार, कामगार अशी कुटुंब मोठ्या संख्येने राहतात. अनेक कुटुंब तर ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थलातंरित झालेली आहेत. अगोदरच कमी पगार, त्यात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत आणि अचानक आलेल्या या बिलाने अनेक कुटुंबांना धक्काच बसला आहे. या बिलाबाबत येथील नागरिकांनी महावितरणकडे ३ महिन्यात अनेक चकरा मारल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.