नांदेड - भारती अॅक्सा लाईफ इन्शुरन्सकडून साडेसहा लाखांचे बिनव्याजी कर्ज देतो म्हणून ठाणे (मुंबई) येथील तिघांनी संगनमत करून भोकर येथील एकाची ६५ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी, भोकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर येथील किरण चंद्रकांत पाटील यांना भारती अॅक्सा लाइफ इन्शुरन्सच्या ठाणे (मुंबई) कार्यालयातून बोलत असल्याचा फोन आला. आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत आहोत. तुम्हाला ६ लाख ४८ हजार २२५ रुपयांचे बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल तर, त्या रकमेच्या १० टक्क्यांप्रमाणे ६५ हजार रुपये तुम्हाला आमच्या बँक खात्यात जमा करावे लागतील. असे सांगून फोन करणाऱ्याने बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड दिला.
बँकेतून थेट व्यवहार होत असल्याचा विश्वास किरण पाटील यांना बसला. त्यामुळे, त्यांनी मुंबई येथील एसबीआय बँक शाखेत पैसे भरण्यासाठी त्याने ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेतून ३० हजार आणि 'गूगल पे' अॅपवरून ३५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर भारती सावंत याने पुन्हा किरण पाटील यांना फोन लावून 'रजिस्ट्रेशन फी' म्हणून आणखी ३१ हजार ५६८ रुपये भरण्यास सांगितले. यावेळी किरण पाटील यांनी 'मी आता पुन्हा पैसे भरणार नाही. मला तुमचे कर्ज नको, माझे भरलेले पैसे मला परत करा' असे सावंत यांना सांगितले. परंतु, तुमचे पैसे परत मिळणार नाही आणि कर्जही देणार नाही, असे सावंत यांनी किरण पाटील यांना सांगितले.