जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली 'जल शपथ' - जागतिक जलदिन
जिल्ह्यात विविध ठिकाणी जल शपथ घेऊन जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी संवर्धनाची शपथ घेतली.
![जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली 'जल शपथ' World Water Day](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11113923-125-11113923-1616419521830.jpg)
नांदेड -जिल्ह्यात विविध ठिकाणी जल शपथ घेऊन जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. आज दि. २२ मार्च रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मी पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची प्रतिज्ञा देखील करीत आहे. तसेच मी, पाण्याचा थेंब अन् थेंब साठवेन आणि कॅच द रेन या अभियानाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण सहयोग देईन. मी पाण्याला एक अनमोल संपदा मानेन आणि असे समजूनच पाण्याचा वापर करेन अशी शपथ घेतली.
जिल्ह्यात जनजागृती सप्ताह -
जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेषत: पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरही राबवले जाणार उपक्रम -
तसेच जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर दि.२२ मार्च ते २७ मार्च दरम्यान राबवले जाणार आहेत. यात आज मंगळवार २३ मार्च रोजी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे, दिनांक २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, दिनांक २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल तर दिनांक २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे, शुन्य गळती मोहिम, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. जल सप्ताह राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.