नांदेडNanded Crime News : कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या (Harvinder Singh Rinda) वडील आणि भावाला आज नांदेड पोलिसांनी अटक केली. 22 सप्टेंबर 2022 रोजी एकाला रिंदाच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. पण त्या व्यक्तीने भीतीपोटी तक्रार दिली नव्हती. त्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पोलीस दलाकडून फिर्याद देऊन काही आरोपींना अटक केली होती. त्या प्रकरणाच्या तपासात कुख्यात दहशदवादी रिंदाचे वडील चरणसिंग संधू आणि भाऊ सरबज्योत सिंग संधू हे देखील सहभागी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यावरुन आज नांदेड पोलिसानी दोघांना अटक केली. त्यांना कलम 384, 385, 387 आणि मोका ॲक्टची कलमे लावण्यात आली आहेत. आज दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी : नांदेड-टेरर फंडींग प्रकरणात रिंदाच्या मित्राला 7 जुलै रोजी अटक केल्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या वडील आणि भावाला अटक करण्यात आली. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी या दोघांना 4 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रिंदाचे नाव वापरून खंडणी वसुली: कुख्यात अतिरेकी हरविंदर सिंग उर्फ रिंदा संधू याने 100 कोटी रुपयांची वसुली केली होती. ते पैसे कसे वापरणार याचं विस्तृत विवरण एका टी.व्ही. मुलाखती केलं होतं. या मुलाखतीपुर्वी रिंदा मरण पावला अशा अफवा उठल्या होत्या. त्यानंतरच रिंदाने ती मुलाखत दिली होती. या मुलखतीनंतर नांदेडमध्ये अनेक जणांनी रिंदाचे नाव वापरून खंडणी वसूल केल्याचे अनेक गुन्हे घडले. काही गडगंज श्रीमंतांनी रिंदाला खंडण्या पण करोडो रुपयांच्या संख्येत दिलेल्या आहेत. त्यानंतर त्या गडगंजांनी स्वतःसाठी आम्हाला रिंदापासून धोका आहे म्हणून पोलीस सुरक्षा रक्षक मिळवली होती.