नांदेड - अर्धापुर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीच्या बागांची पाने फाटून गेली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.
रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
जिल्ह्यात रविवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. हळदीचा काढणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. हळद शिजवून उन्हात वाळवणासाठी ठेवलेली हळद भिजली तर फळबागासह उन्हाळी ज्वारी व इतर मोठा फटका बसला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून केळीच्या बागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून सर्व पाने फाटली आहेत. तर अर्धापूर तालुक्यातील लहान व आंबेगाव परिसरात काढणीस आलेल्या शेतकऱ्यांच्या बागा आडव्या झाल्या आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा केळीचे क्षेत्र वाढले
अर्धापूर तालुक्याचे क्षेत्र बागायती असल्यामुळे उन्हाळी ज्वारी, ऊस, भुईमूग पिकासह केळीचे पीक घेतले जाते. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी व ऊसाचे पीक आडवे पडली आहेत. तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे क्षेत्र असून इसापूर व येलदरीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे. यंदा केळीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत वाढले आहे.