नांदेड- जिल्हा पोलीस दलाचे महत्त्वाचे अंग असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावरुन पोलीस दलात होत असलेली रस्सीखेच थेट मुंबई पर्यंत पोहोचली आहे. परिणामी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी या रस्सीखेचीत सहभागी असलेले सुनील निकाळजे आणि रामराव गाडेकर यांना थेट मुंबईला तडकाफडकी बोलावले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावरुन रस्सीखेच; दोन्ही पोलीस निरीक्षकांना महासंचालकांनी बोलावले - sunil nikalje
पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी सुनील निकाळजे व रामराव गाडेकर यांना थेट मुंबईला तडकाफडकी बोलावले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सत्ता सूत्रे बदलल्यामुळे पोलीस दलातील नियुक्तीतही हस्तक्षेप सुरु झालाचे चित्र आहे. त्यातूनच गत काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी आपल्या मर्जीतील अधिकारी आणावा म्हणून सत्ताधारी नेत्यांनी जोर लावला असल्याचे दिसतेय. परंतु त्याला फारशी दाद मिळत नसल्याने हा पेच थेट मुंबईत पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचला आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे व हदगाव पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर या दोघांनाही मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न होण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. हे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा नांदेडला धडकताच या दोन्ही अधिकाऱ्यांना मुंबईला जाण्याची तयारी करणे भाग पडले आहे.
या प्रकरणामुळे पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. महासंचालकांच्या आदेशामुळे जिल्हा पोलीस दल हादरले आहे. कारण दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे पोलीस महासंचालकांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गाडेकर यांच्या रिक्त जागेवर हदगावला पोलीस निरीक्षक म्हणून दिलीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निकाळजे यांचा उत्तराधिकारी अजून निश्चित झालेला नाही. सोमवारी हे दोन्ही अधिकारी पोलीस महासंचालकांसमोर हजर झाल्यानंतर तेथील नियंत्रण कक्षात त्यांना रुजू व्हावे लागणार आहे. परंतु हा कार्यकाळ किती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.