नांदेड - शहरातील मालेगाव मार्गावरील भक्ती लॉन्समध्ये आजपासून (१७ ऑगस्ट) मराठी पत्रकार परिषदेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे. मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे हे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते होणार आहे.
नांदेडमध्ये आजपासून पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन या अधिवेशनास देशभरातून अडीच हजार प्रतिनिधी येणार असून दोन दिवसीय अधिवेशनात चर्चासत्रांची वैचारिक मेजवानी मिळणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी दिली.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, झी-न्यूजचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे तर अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. च्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर दीक्षा धबाले, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम रातोळीकर, आमदार अमर राजूरकर, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे. दुसरे सत्र दुपारी २ ते ३.३० या वेळेत होणार आहे. सोशल मिडीयाचे आव्हान इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडियाला पेलवणे आता अवघड झाले आहे का? यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, दैनिक सकाळचे संपादक श्रीमंत माने, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशिष जाधव, जेष्ठ संपादक विलास आठवले, न्यूज नेशनचे संपादक सुभाष शिर्के, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वृत्तपत्र विभागाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, बी. बी. सी. मराठी न्यूजच्या हलिमा कुरेशी या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
दुसरा परिसंवाद दुपारी ४ ते ५.३० या वेळेत होणार आहे. यात माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरते उरले का? यावर परिसंवाद होणार आहे. यात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, डाव्या आघाडीचे नेते भालचंद्र कांगो, जेष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सामाजिक कार्यकर्ते मंगल खिंवसरा हे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी (१८ ऑगस्ट) सकाळी ९.३० ते १०.३० वा दरम्यान ज्येष्ठ पत्रकार व परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याशी चर्चा व संवाद होणार आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे संवादक म्हणून काम पाहणार आहेत. परिषदेचे खुले अधिवेशन सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वा. दरम्यान होणार आहे. समारोप समारंभ दुपारी २ ते ४ दरम्यान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुख्य अतिथी म्हणून तर, प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी पा. निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व अध्यक्षस्थानी परिषदेचे भावी अध्यक्ष गजानन नाईक हे राहणार आहेत.
यावेळी विशेष निमंत्रित म्हणून टाईम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ संपादक प्रफुल्ल मारपकवार, आज तकचे संपादक साहिल जोशी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धमेंद्र जोरे, टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे प्रदीप मैत्र, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे किरण नाईक, महाराष्ट्र संपादक परिषदेचे संजय मलमे, बीयुजेचे सरचिटणीस इंदरकुमार जैन उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय अधिवेशनास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जिल्हाभरातील पदाधिकारी, पत्रकार व सदस्य परिश्रम घेत आहेत.