नांदेड :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत माहिती दिली. आज जिल्हा परिषदेत सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी वर्षा ठाकूर घुगे यांनी वेबिनारव्दारे जिल्हयातील सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्या रोल मॉडेल..
पुढे त्या म्हणाल्या, गावस्तरापासून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर तसेच विविध महिला अधिकारी व कर्मचारी नोकरी करुन घराची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या रोल मॉडेल असून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कार्य पुढे नेणे आज काळाची गरज आहे.
जि. प. विविध कार्यक्रम राबविणार..
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार यांचा मानस आहे. त्यानुसार महिलांसाठी कार्यशाळा, आरोग्य तपासणी, महिला कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वित्तीय बाबींसंदर्भात प्रशिक्षण, नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, व्याख्यान, परिसंवाद, मुलींचे शिक्षण व संरक्षण आदी कार्यक्रम वर्षभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली.