नांदेड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज (दि.19नोव्हें)ला सकाळी साडेअकराच्या सुमारास काढण्यात येणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृह क्रमांक 4 येथे या सोडतीचा ड्रॉ निघणार असल्याची माहिती राज्य सरकारचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी दिली आहे.
यासाठी इच्छुक उमेदवार काल (सोमवार) सायंकाळी मुंबईला रवाना झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून, विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. डिसेंबरमध्ये ही मुदतवाढ संपत असल्याने आरक्षण सोडत होणार आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी सुटते, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
जवळगावकर यांच्या आधी काँग्रेसच्या मंगलाबाई गुंडले या अनुसूचित जातीतून महिला प्रवर्गाच्या आरक्षणातून जि.प. अध्यक्षा झाल्या होत्या. यानंतर पुन्हा महिलेला संधी मिळाली असून, उर्वरित 26 महिन्यांच्या कार्यकाळाची कोणाला संधी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये नांदेडच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा समावेश आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी देखील नांदेडची जागा जाऊ शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.