नांदेड - जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाची हत्या करणाऱ्या अलीखान मुख्तारखान (वय-22) या आरोपीला बुधवारी जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तरुणाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास सुनावली जन्मठेपेची शिक्षा हेही वाचा - अमरावती : मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी मदरशातील 'त्या' शिक्षिकेला अटक
जुन्या नांदेड शहरातील महंतवाडी मरघाट चौफाळा भागात राहणारा गजानन हरीभाऊ गाडे (वय-22) व अलीखान मुख्तार खान (वय-22) (राहणार बुरुड गल्ली, किल्ला रोड नांदेड) यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून 20 फेब्रुवारी 2016 रोजी अलीखान याने गजानन गाडेला घराबाहेर बोलावले. गंगानगर परिसरातल्या माजी उपमहापौर अब्दुल शमीम यांच्या निवासस्थानासमोर त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गजानन गाडेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गजाननची आई अनसूयाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिसांनी आरोपी अलीखानविरुध्द कलम 302, अट्रोसिटी कलम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इतवारा उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणी 12 जणांच्या साक्षी नोंदवल्या. त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद व उपलब्ध पुराव्याच्या आधारे बुधवारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी आरोपीला जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकारची बाजू अॅड. संजय लाठकर यांनी मांडली.
हेही वाचा - पुण्यात गॅस कटरने एटीएम फोडून ११ लाख रुपये लंपास