नांदेड -यंदा 21 जून रोजी जागतिक योगदिनावर कोरोनाचे सावट असणार आहे. असे असले तरी गतवर्षीच्या नांदेड येथील योगदिनाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. गतवर्षी शहरातील पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या अहवालाचे प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या संकल्पनेतून नांदेड योगदिन स्मरणिका तयार करण्यात आली आहे.
गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी नांदेडची निवड केली होती. अवघ्या 11 दिवसात हा योग दिन यशस्वीपणे साजरा करण्याची जबाबदारी सध्याचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. जवळपास लाख-दीड लाख लोकांच्या योगासनाच्या व्यवस्थेसाठी मैदान तयार करण्याचे काम चिखलीकरांनी घेतले. जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून चिखलीकरांनी आपल्या कार्यकर्त्यांची टीम रात्रंदिवस राबविली. अखेर आतरराष्ट्रीय योग दिनी (21 जून) एकाच मैदानावर 1 लाख 35 हजार नांदेडकरांनी योगासन करून जागतिक विक्रम केला होता.
नांदेड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनातील सुवर्णक्षणाची नोंद स्मरणिकेच्या माध्यमातून जतन करण्याचा प्रयत्न प्रणिता देवरे यांनी केला आहे. या स्मरणिकेचे संपादक स्वामी आनंददेवजी महाराज यांनी मांडणी केली आहे. स्मरणिकेचे मुखपृष्ठ जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे यांचे आहे. तर स्मरणिकेतील फोटो संकलन अखिलखान यांनी केले आहे.
स्मरणिकेच्या प्रकाशनाला नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे-चिखलीकर, युवा भारतचे राज्य प्रभारी अभय काबरा, राज्य कार्यकारणी सदस्य राम पटल यादव, वरिष्ठ योग शिक्षिका जयश्री देसाई, कृष्णा पापीनवार उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा योगदिनानिमित्त मैदानावर एकत्रितपणे योगासन करण्यावर निर्बंध असणार आहेत. यंदा अनेकजण घरातच राहून ऑनलाईन पद्धतीने जागतिक योगदिनात सहभागी होणार आहेत.