नांदेड - आम्ही महिला केवळ अत्याचार सहन करण्यासाठी, बलात्कार होण्यासाठी, अॅसिड टाकून जीव घेण्यासाठी, पेट्रोल टाकून जाळण्यासाठी आहोत. अशीच मानसिकता असेल, तर आम्हा सर्व महिलांना गोळ्या घालून मारून टाका, असा संताप नांदेडमधील महिलांनी व्यक्त केला. विविध महिला संघटनेच्या वतीने शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिंगणघाट येथील पीडित प्राध्यापिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवला.
अत्याचार करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका, नांदेडमध्ये महिला संतप्त राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. हिंगणघाट येथील प्रध्यापिकेवर झालेला अत्याचार सहन न होणारा आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने महिला केवळ शोषणासाठी आहेत हेच दाखवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.
हिंगणघाट येथील पीडितेला न्याय कधी मिळणार? महिलांवरील, चिमुकलींवर होणारे अन्याय, अत्याचार कधी थांबणार, असे सवाल यावेळी दीपा बियाणी यांनी उपस्थित केले. तसेच यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी डॉ. शोभाताई वाघमारे यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.
हिंगणघाट जळीतकांड -
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात ३ फेब्रुवारीला एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळले. त्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे भाजला होता. तसेच तिची श्वसननलिका देखील जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ७ दिवस उपचार सुरू होते. मात्र, अखेर आठव्या दिवशी तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून ठिकठिकाणी रोष व्यक्त करण्यात येत आहे.