नांदेड- येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प टक्के भरला असून, प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. गोदावरी नदीत ४६३ क्युसेक विसर्ग होत आहे. त्याचबरोबर प्रकल्पात सध्या ०.५ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा १०० वरून ८० टक्क्यापर्यंत येईपर्यंत दरवाजा उघडून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.
गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात शुक्रवारी दुपारी तीन वाजता शंभर टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे १८ दरवाजापैकी १३ क्रमांकाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. प्रकल्पात वरच्या भागातून पाण्याचा विसर्ग येत असल्याने धरणाचा एक दरवाजा उघडून त्यातून ४६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी हा प्रकल्प जुलै महिन्यातच शंभर टक्के भरला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस असलेल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात १११ मिलीमीटर, चुडावा ९० तर ताडकळस मंडळात ५३ मिली मीटर तर सरासरी ५९.४० मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली. त्यामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आणि हे पाणी गोदावरी नदीमार्गे विष्णुपुरी प्रकल्पात आल्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.